SocialTrending

तूमचे उज्ज्वल भविष्य तुमच्याच हातात

१ प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी-  घडयाळाचे काटे जसे २४ तास आखून दिल्याप्रमाणे फिरतात त्या प्रमाणे तुम्हाला २४ तासत करावयाच्या गोष्टींची आखणी करावयाची आहे. तुमचे २४ तासांचे वेळापत्रक तयार करा. गरज भासल्यास मोठयांची मदत व मार्गदर्शन घ्या. एकदा वेळापत्रक तयार झाल्यावर शक्य तितके त्यानुसार प्रत्येक गोष्टीच्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. मोठयांची मदत घेतली तर तुम्हाला ते सोपे जाईल, तुम्ही असे काही दिवस चिकाटीने आणि तंतोतंत केले की तुमच्या लक्षात येईल, की त्या-त्या गोष्टीसाठी तुमचा मूड त्या – त्या वेळी आपोआप तयार होईल. जसे, तुमच्या वेळापत्रकानुसार अभ्यासाची जी वेळ असेल त्या वेळेला अभ्यास करण्याची आणि व्यायामाच्या वेळेला व्यायाम करण्याची तुमची तीव्र इच्छा होईल.

२ – चांगली संगत अती मोलाची – मैत्री व गोड वागणूक सगळयांशीच ठेवा परंतु घनिष्ठता ठेवण्यासाठी मात्र फक्त मोजक्याच मित्रांची निवड करा. याबाबतीत खूप काळजी घ्या, कारण लक्षात ठेवा की चांगल्या संगतीमुळे तुमचे मन तुमच्या नकळत चांगले होईल व वाईट आणि आक्षेपार्ह संगतीमुळे तुमचे मन तुमच्या नकळत बहकून आणि बिघडुन जाईल. जर तुमचा मित्र तुमच्यावर चुकीच्या गोष्टी करण्यासाठी मानसिक दडपण आणत असेल तर सर्व शक्तीनिशी कठोरपणे ते दडपण झुगारुन द्या.असल्या मित्राचे मन राखण्याची गरज नाही. तो तूमचा मित्र होण्याच्या लायकीचा नाही असे समजा. त्याचा नाद तुम्ही जितक्या लवकर सोडाल तितके बरे. महाभारतात कर्णाने दुर्यौधन इत्यादी मित्रांची निवड करताना चूक केली व ती त्याला जन्मभर भोवली. पांडवांनी मात्र मैत्रीसाठी कृष्णाची निवड केली व पांडवांमध्ये काही गंभीर स्वभाव दोष असूनसुध्दा त्यांचे रक्षण झाले व त्यांना महानत्व प्राप्त झाले. म्हणून योग्य मित्रांची निवड करण्यास वेळ लागला तरी चालेल. याबाबत गलथानपणा किंवा चूक केली तर किती धोक्याचे ठरेल याची कल्पना करणे सुध्दा कठीण आहे .गळयात आकडा रूतून बसलेल्या माशाची तसेच सापळ्यात अडकलेल्या उंदराच्या अवस्थेची कल्पना करा. म्हणजे जीवनात सावधानता किती महत्वाची आहे हे त्यांच्या उदाहरणावरुन तुम्हाला शिकावयास मिळेल.

३ प्रलोभनांपासून सुरक्षित अंतर – जगात माणसाच्या मनाला प्रलोभित करुन त्याच्या ध्येयापासून त्याला दुर नेणाऱ्या अनेक गोष्टी असतात. त्यातही अंमली पदार्थांची तसेच भित्रलिंगी व्यक्तींची प्रलोभित करण्याची वा मोहात पाडण्याची शक्ती प्रचंड असते. एकदा तुम्ही त्या पदार्थांच्या किंवा व्यक्तींच्या संपर्कात येउन मोहजालात सापडलात तर त्यातून स्वत:ची सुटका करुन घेणे जवळ-जवळ अशक्यच असते. अभ्यास करणे तर दूर परंतु करावयाच्या इतर आवश्यक गोष्टींतून सुध्दा तुमचे मन उडून जाईल. लक्षात ठेवा सर्वसाधारण मनुष्याचे मन खूप कच्चे असते व ते विविध प्रकारच्या उत्तेजनांना त्यांच्या आकर्षकतेमुळे आणि मादकतेमुळे पटकन बळी पडते. तसले संस्कार मनात अगोदरचेच दडलेले असतात आणि कुसंगतीमुळे ते खूप प्रबळ होतात म्हणून याबाबतीत खूप काळजी घ्या व जमेल तितके प्रलोभनांपासून व उत्तेजनांपासून दूर रहा.

४ शरीर आणि मनाची स्थिरता फार महत्वाची – दररोज नियमितपणे एका जागी स्थिर बसण्याचा अभ्यास करा. मस्तकापासून पायापर्यंत शरीराच्या कोणत्याही अवयवाची थोडीसुध्दा हालचाल नको. संपूर्ण निश्चलता व स्तब्धता साधण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना मनाच्या स्थिरतेचा विचार करू नका, शरीराची अधिकात अधिक स्थिरता जर तुम्हाला साधली तर त्याचा मनाच्या स्थिरतेसाठी खूप उपयोग होईल. शरीराच्या स्थिरतेनंतर थोडयावेळ अगदी स्वाभाविकपणे दीर्घ श्वास घ्या व तसाच दीर्घ श्वास सोडा. हे करताना फक्त श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या. यानंतर मनात येणा-या विचारांकडे फक्त तटस्थपणे बघा. मनात कोणताही बरावाईट विचार येवो, त्याला थोपविण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करु नका. त्यांना येउ द्या आणि जाउ द्या. तुमच्या मनात त्यात गुंतू दुउ नका. हे काही वेळ केल्यानंतर ,चर आणि अचर सष्टीमध्ये व्याप्त असलेले जे चैतन्य दिव्य रुपात तुमच्या ह्दयात मूर्त आणि अमूर्त रूपात वसत आहे, त्यावर मन एकाग्र करा. ह्दयात स्थित ‍ असलेल्या त्या करुणावर परमेश्वराला मनाच्या स्थिरतेसाठी व शांतीसाठी मनोभावे अवश्य प्रार्थना करा. मनाच्या स्थिरतेसाठी व एकाग्रतेसाठी आवश्यक असलेली ध्यानाची प्रक्रिया अगदी थोडक्यात वर दिलेली आहे. याचा तूम्ही नियमितपणे आयुष्यभर अभ्यास केला तर जीवनाला  स्थिरता, दृढता आणि साफल्य येते व परमशांतीची अनुभव येतो. परंतू हा विषय अत्यंत गंभीर असल्यामुळे व सतत प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज असल्यामुळे इजा टाळण्यासाठी काही गोष्टी कटाक्षोन पाळा.

५ – करमणूक वा मनोरंजन किती – आजकाला करमणूकीची साधने इतकी झाली आहेत की तूम्ही त्यांच्या नादी लागलात आणि त्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेत तरी ते तुम्हाला पुरणार नाही. मनाला नेहमीच वाटत राहते की त्याच्यावर ताण आहे आणि तो हलका करण्यासाठी मनोरंजनाची गरज आहे. आधी हलक्याफुलक्या आणि नंतर चटक लावणाऱ्या मनोरंजनांच्या आहारी मनुष्य जातो,मग त्याशिवाय तो सतत बेचैन राहतो व पाहतापाहता तो व्यसनी बनतो. म्हणून मनोरंजन किती व कोणकोणत्या प्रकारचे हवे ते तुम्ही ठरवा. शक्यतोवर हीन प्रतीच्या मनोरंजनांपासून दोन हात दूर राहा. कारण मनोरंजन प्रारंभी जरी अतिशय गोड, आकर्षक व आवडणारे वाटत असले तरी चटक लागल्यानंतर ते मनाची शक्ती व तेज, शरीराचे बल, रुप, बुध्दी , उत्साह व चारितय इत्यादींना नष्ट करणारे असल्यामुळे परिणामी विषासारखे असते. म्हणून ग्रंथवाचन, विचारांचे श्रवण इ.उच्च प्रकारच्या विषयात मनाला रमवा. दिवसांतून थोडावेळ तरी महान लोकांची चरित्रे व प्रेरणादायी विचारांचे नियमितपणे वाचन करा. यामुळे तुमच्या मनाची योग्य ती मशागत होईल व तूम्हाला निकोप आनंदाचा लाभ होईल.

६ – ईर्षा,हेवा, मत्सर म्हणजे वाळवी – घराला, लाकडाला वाळवीची कीड लागली की घर, फर्निचर पोखरल्या जाउन पूर्णपणे निकामी होते. त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनात हे भयंकर दुर्गुण शिरले की तो मनाने खंगत जातो. म्हणून हे दुर्गुण तुमच्यात नकोत. खूप परिश्रम करा व अधिकाधिक यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. परंतु दुसऱ्यांशी कुरुप स्पर्धा नको. ह्या जगांत प्रत्येकजण वैशिष्टपूर्ण असतो व प्रत्येकाच्या यशाचा मार्ग स्वतंत्र असतो. म्हणून इतरांशी तूलना नको. तूम्ही तूमच्या मार्गाने जा व इतरांना त्यांच्या मार्गाने जाउ द्या. तुम्ही झुरु नका, कुढु नका. या जगात कुणी परका नाही, सगळे तूमचेच आहेत म्हणून त्यांचे वाईट चिंतू नका. सगळयांचेच भले होवो अशी देवापाशी दररोज प्रार्थना करा.

७ – तूमचे उज्ज्वल भविष्य तूमच्या हातात – मानवी जीवन नदीच्या प्रवाहासारखे कधी सरळ तर कधी वेडेवाकडे असते. त्यामुळे समस्यांपासून दूर पळू नका तर ‍हिंमतीने तोंड द्या. जगातील सर्वांकडून वेगवेगळया प्रकारची मदत मनुष्याला सतत मिळत असते. त्यामुळे सर्वांविषयी कृतज्ञतेचा भाव सदैव बाळगा. मनुष्याला काही दु:ख झाले किंवा त्रास झाला तर त्यासाठी तो दुसऱ्याला दोषी धरतो. तुम्ही तसे न करण्याचा प्रयत्न करा. कारण दुसऱ्यांवर दोष लादण्याच्या सवयीने मनुष्य आणखीच दुबळा बनत असतो. म्हणून स्वत:च्या दोषांसाठी कुणालाही बोल लावू नका, स्वत:च्या पायांवर उभे राहा आणि सर्व जबाबदारी आपल्या स्वत:वर घ्या. स्वामी विवेकानंदांनी याविषयी व्यक्त केलेल्या खालील अत्यंत प्रेरक विचारांवर चिंतन करा.

      तूम्ही पक्की खूणगाठ बांधून बसा की तुमच्या भाग्याचे विधाते तूम्हीच आहात. जे बल व साहाय्य तुम्हास हवे आहे ते तुमच्या स्वत:च्या आतच आहे. हे जाणून स्वत:च स्वत:चे भवितव्य घडवा. जे झाले ते होउन गेले त्याबद्दल खंत करीत बसू नका. म्हणतात ना की, वाहिले ते पाणी नि  राहिली ती गंगा. अनंत भावीकाळ तुमच्यापुढे विस्तारलेला आहे. आणि हे तूम्ही नेहमी लक्षात ठेवावयास हवे की तूमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार नि प्रत्येक कृत्य तुमच्या गंगाजळीत संचित राहील. आणि हे पण सदा लक्षात असू द्या की , तुम्ही केलेले कुविचार आणि तुम्ही केलेले कुकर्मे ज्याप्रमाणे वाघासारखी तुमच्यावर झेप  घेण्यास टपून आहेत, त्याचप्रमाणे ही देखील मोठ्या स्फुर्तिदायी आशेची गोष्ट आहे की तुमचे सद्विचार आणि तूमची सत्कर्मे हजारो लाखो देवदूतांच्या शक्तीने तुमचे रक्षण करण्यास सदासर्वदा सज्ज आहेत.

      चांगल्या कल्पना, चांगले विचार आणि चांगली संगत चांगले मन तयार करतात. चांगले मन सुखी आणि आनंदी असते. सुखी आणि आनंदी मन एकाग्र तुमच्या चिंतनासाठी व आचरणात आणण्यासाठी वर काही विचार दिले आहेत. त्यांचा जमेल तितका उपयोग करुन घ्या. सर्व ज्येष्ठांच्या शुभेच्छा तुमच्या सदैव पाठीशी आहेत. आणि आता स्वामी विवेकानंदांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे, उठा,जागे व्हा,आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.

अनुवाद करणारा : राम ढेकणे

वरील माहीती स्वामी विष्णूपादानंद यांच्या पुस्तकांतून घेतलेली आहे..   

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!